गंगापूर, (प्रतिनिधी) : पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी पदभार स्वीकारताच शहरातील टवाळखोर आणि रोड रोमिओंविरुद्ध धडक मोहीम सुरू केली. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही वेळातच त्यांनी धूत कन्या शाळा, मुक्तानंद महाविद्यालय व नवीन बसस्थानक परिसरात भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि रोड रोमिओंना चांगलाच दणका दिला.
शाळा सुटण्याची वेळ असल्याने बसस्थानक परिसरात विद्यार्थिनींची मोठी गर्दी होती. याचवेळी काही युवक
मोटारसायकलवरून विनाकारण फेऱ्या मारत होता पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी तत्काळ कारवाई केली. संबंधित युवकांना जागेवरच पकडून त्यांची कानउघाडणी करण्यात आली. पुन्हा अशा प्रकारचे गैरकृत्य केल्यास थेट गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या या कारवाईमुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. अनेक टवाळखोरांनी तेथून काढता पाय घेतल्याचे दिसून आले. महिलांची आणि विद्यार्थिनींची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये, बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारच्या धडक कारवाया सातत्याने सुरू राहतील, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला. मात्र पोलिसांचा धाक निर्माण झाल्याची चर्चा गंगापूर शहरात सुरू आहे.
नवीन पोलीस निरीक्षकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली असून, रोड रोमिओ व टवाळखोरांमध्ये शहरात महिला, विद्यार्थिनी सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी टवाळखोर, रोड रोमिओ किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणालाही अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. अशा प्रवृत्तीविरुद्ध सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येईल. प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे पोलिसांना सहकार्य करावे व संशयास्पद किंवा त्रासदायक प्रकारांची तातडीने माहिती द्यावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- सलीम चाऊस, पोलीस निरीक्षक, गंगापूर पोलीस ठाणे













